पुणे -नवऱ्याच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून गळा आवळून खून करीत पत्नीने त्याला गळफास देत लटकविले. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करून दोन दिवस ती बाहेर गेली. मात्र, अंत्यसंस्कारावेळी मुलीने बाबाला आईनेच मारल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याने या गुन्ह्याला वाचा फुटली.
दीपक बलवीर सोनार (वय 36, रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (दि.12) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. दीपक सोनार रखवालदाराचे काम करत होता. तो गुरुवार पेठीतील एका वाड्यात पत्नी व मुलगीसोबत राहायला होता, त्याची पत्नी कपड्याच्या दुकानात काम करते. दीपकला दारूचे व्यसन असल्यामुळे आणि पत्नी कामावरून घरी रात्री उशिरा आल्यामुळे सतत संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी (दि.12) रात्री पत्नी कामावरून आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले, त्यावेळी तिने दीपकला दांडक्याने मारहाण केली.
त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दीपकचा मृतदेह उचलून बाथरूमध्ये नेऊन दोरीने लटकवला, त्यानंतर दोन दिवस घराबाहेर गेली. परत आल्यानंतर तिने पती दीपकने गळफास घेतल्याचा बनाव करून नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला होता.
दरम्यान दीपकच्या अंत्यसंस्कारावेळी मुलीने तिच्या आईच्या कृत्याचा भांडाफोड करत वडिलांचा खून केल्याचे नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.