पुणे – मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आठ पिडीत तरुणींची सुटका केली. याप्रकरणी स्पा सेंटरची 45 वर्षीय मालकीन व मॅनेजर निकीत मोतिलाल अगरवाल (वय.24,रा. प्राधिकरण) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस हवालदार निलम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालेवाडी फाटा बाणेर येथील कणक स्पा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी वेश्यव्यावसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी राजेंद्र कुमावत, हनुमंत कांबळे महिला कर्मचारी निलम शिंदे अश्विनी केकाण यांच्या पथकाने छापा टाकून मालकी व मॅनेजर दोघांना अटक केली.
आठ पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी केली.