पुणे – नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील आरोपींकडून चालविले जाणारे कॉल सेंटर पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी उध्वस्त करून टाकले. एका फसवणूकीच्या गुन्ह्यातील सव्वा नऊ लाख रुपये पोलिसांनी परत मिळविले. त्याचबरोबर कॉल सेंटर चालविणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या.
रिषभकुमार अनिल दुबे, विपीन अशोक यादव, रिषभ मनीष दुबे, पियुशकुमार सतीश यादव (चौघेही रा.जे.जे.कॉलनी, सेक्टर नं 7, द्वारकारा, रामफल चौक,दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी एका महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत आहे. त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, यासाठी ऑनलाईन जॉब पोर्टलवर आपली वैयक्तीक माहिती भरून दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आरोपींनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक व डोमेन तयार करून त्याद्वारे बनावट ई-मेलद्वारे महिलेशी संपर्क साधला.
मुंबई व पुण्यातील एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून सव्वा नऊ लाख रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे घेतले होते. या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बॅंकेची माहिती प्राप्त करून व न्यायालयाच्या आदेशाद्वारे फिर्यादीची फसवणूक झालेली सव्वा नऊ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली.
या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर संबंधित गुन्हे नवी दिल्ली येथून घडले जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक दिल्ली येथे गेले. तेथे आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यावेळी आरोपींकडून एका इमारतीमध्ये कॉल सेंटर चालवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेथेच नागरीकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून नागरीकांची ऑनलाईन फसवणूक करीत असल्याचे पोलिसांनी पाहीले.
त्यानुसार, पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधीत कॉल सेंटरवर छापा घालून संबंधीत कॉल सेंटर उध्वस्त केले. तसेच तेथून चौघांना अटक केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते, पोलिस निरीक्षक डि.एस.हाके, अंकुश चिंतामण, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलिस उपनिरीक्षकअर्जुन बेंदगुडे, अस्लम आत्तार यांच्या पथकाने हि कामगिरी केली.