पुणे – केसनंद-थेऊर रस्ता परिसरात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. महेश तानाजी घोगरे (28, रा. कात्रज), मंजय रामचंद्रप्रसाद साह (38, रा. भोसरी, मूळ, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घोगरे याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. तर, साह यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे हे स्टाफसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान केसनंद थेऊर रस्ता परिसरातील कोलवडी लिबर्टी बेकरी जवळ दोघेजण गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता घोगरे आणि साह यांच्या वैंबरेला प्रत्येकी एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन पिस्तूल, सहा काडतूसे जप्त केली आहेत. ही कामगिरी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, हवालदार बाळासाहेब सकाटे, बाळासाहेब तनपुरे, दिपक कोकरे, साई रोकडे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तूलसह गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्यावर उत्तमनगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश दादू सोनवणे (26) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलीस गस्तीवर असताना सोनवणे हा कोंढवे-धाडवे परिसरातील पिकॉक लॉजसमोर असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा लावून सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, जिवंत काडतुसे असा 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.