पुणे – सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना कात्रज येथील सावंत विहार सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वसंत अरुण नाईक (41) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र रामचंद्र ढोणे (55, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या मुलीचा वसंत नाईक याच्याबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा घरगुती कारणावरून छळ करण्यात येत होता. सततच्या छळास कंटाळून त्यांच्या मुलीने सोमवारी राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या महिलेचा पती हार्डवेअरच्या वितरकाकडे कामाला आहे. त्याला दारुचे व्यसन असून तो पत्नीचा सातत्याने छळ करत होता. त्यांना 11 वर्षाचा मुलगा आहे. विवाहितेने आत्महत्या करताना स्वत:च्या तसेच शेजारच्या सदनिकांना बाहेरुन कडी लावली होती. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे तपास करत आहेत.