पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथक-2 यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या तीघांना ताब्यात घेऊन तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. हा तब्बल 520 किलोचा गांजा कर्जत येथे नेण्यात येणार होता. पोलिसांनी गाडीची झडती घेऊ नये तसेच संशय येऊ नये म्हणून त्यांनी एका महिलेला पैसे देण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले होते. तसचे गाडीला महाराष्ट्र शासनाची पाटी लावण्यात आली होती.
त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ, सेलेरिओ कार , मोबाईल असा 15 लाख 71 हजाराचा इतर ऐवजही जप्त करण्यात आला आहे.
संदिप बालाजी सोनटक्के ( 29, रा. खालापूर जिल्हा रायगड) , निर्मला कोटेश्वरी मूर्ती जुन्नरी ( 36 रा. गंटूर राज्य आंध्र प्रदेश) आणि महेश तुळशीराम परीट ( 29 , रा. खालापूर जिल्हा रायगड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उपनिरीक्षक डी.एस.नरके पथकासह लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना
अंमलदार योगेश मांढरे यांना खबर मिळाली की, दोन पुरुष व एक महिला आंध्र प्रदेशातून स्कॉर्पिओ आणि सेलेरिओ कारमधून गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या गाडीला महाराष्ट्र शासनाची पाटी लावलेली आहे. त्यानूसार सापळा रचून दोन्ही गाड्यांना अडवून झाडाझडती घेण्यात आली.
दोन्ही गाड्यांमध्ये 520 किलो 550 ग्रॅम 1 कोटी 19 लाख 82 हजार रुपयांचा गांजा सापडला. स्कॉर्प्रिओमध्ये चालका शेजारी महिलेला बसविण्यात आले होते. तर मागील सर्व सीटी पाडून त्यावर पोती ठेवण्यात आली होती. सिलेरिओ कारमध्येही तसेच करण्यात आले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून गाड्यांना महाराष्ट्र शासनाचे फलक लावण्यात आले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा माल विशाखापट्टणम येथून विकत घेण्यात आला होता. तो पुणे आणि नवी मुंबई येथे विकण्यात येणार होता. यातील दोन्ही पुरुष आरोपींवर अगोदर गुन्हे दाखल आहेत. शहरात शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हुक्का पॉट, सिगार आणि गांजा पिण्याच्या पुगंळ्या विक्रीची दुकाने आहेत. वरकरणी जरी येथे फक्त साहित्य विकत असल्याचे भासवले जात असले तरी चोरी छुपे नियमीत ग्राहकांना गांजाही विकला जातो. यामुळे मागील काही वर्षात शहरात गांजाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक एस. डी. नरके. पोलीस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे ,युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी. संदीप जाधव मयूर सूर्यवंशी मनोज साळुंखे विशाल दळवी विशाल शिंदे सचिन माळवे दिनेश बाष्ठेवाड, अविनाश कोंडे, ऋषिकेश महल्ले, सलीम तांबोळी, किरण बर्डे यांनी केली आहे.