पुणे – भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाखांची रोकड, दागिने असा साडेचार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना कात्रजमधील एका सोसायटीत घडली.
किरण शेटे (वय ६०, रा. कांचननगरी सोसायटी, मोरे बाग, कात्रज) यांनी यासंदर्भात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेटे दोन दिवसांपूर्वी सकाळी अकराच्या सुमारास सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडले. शयनगृहातील लाकडी कपाट उचकटून चोरट्यांनी एक लाखांची रोकड आणि दागिने असा चार लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सायंकाळी सहाच्या सुमारास शेटे कुटुंबीय परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याचे कुलुप तुटल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार तपास करत आहेत.
दरम्यान, सिंहगड रस्ता भागातील धायरीत दोन सदनिका फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संदीप झराड (वय २६, रा. ज्ञानेश्वरी पार्क, नºहे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झराड यांची धायरीतील गारमाळ परिसरात धारेश्वर हौसिंग सोसायटीत सदनिका आहे.
चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ३६ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू लांबविल्याचा प्रकार शनिवारी घडला. याच भागातील श्री अपार्टमेंटमधील रहिवासी विनोद काटकर यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पोलीस हवालदार व्ही. व्ही. गवळी तपास करत आहेत.