पुणे – रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन तरुणाने भर रस्त्यात दोन तास राडा घातल्याची घटना निलायम ब्रीज येथे घडली. वाहतूक शाखा तसेच दत्तवाडी पोलिसांनी संबंधीत तरुणाला कसेबसे ताब्यात घेतले. त्याला दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले, मात्र त्याने तेथूनही पळ काढला. तो मानसिक रुग्ण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
निलायम ब्रीज येथे एका तरुणाने सकाळच्या सुमारास वाहतूक सुरु असताना रस्ता अडवून धिंगाणा घालण्यास सुरवात केली. दरम्यान तेथून जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेत घुसून त्याने स्टेअरिंगचा ताबा घेतला. तो काही केल्या रुग्णवाहिकेतून बाहेर पडत नव्हता. दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने तेथे वाहतूक पोलीस आले. त्यांनी कसबस बळाचा वापर करुन त्याला बाहेर काढले. मात्र त्याने रस्त्यावर कपडे काढून पुन्हा धिंगाणा घातला. तेथील वीजेच्या डिपीवरही त्याने दगड मारले. पोलिसांना आवरत नसल्याने अखेर बळाचा वापर करुन त्याचे हात बांधण्यात आले. यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
रुग्णवाहिका व्हॅक्सिनची वाहतूक करणारी होती. यामुळे रुग्णवाहिका चालकाला व्हॅक्सिन वेळेवर पोहचवता आले नाही. रस्त्यावरही इतर गाड्यांवरही त्याने दगड फेकण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनाही तो धरुन धक्का-बुक्की करत होता. दरम्यान त्याला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असता, तो तेथून पसार झाला. या नाट्यामुळे मात्र परिसरात तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
“तो मानसिकदृष्ट्या स्थिर दिसत नाही. तो सतत बोलत असतो पण अल्कोहोल किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली नाही. आम्ही त्याला अन्न दिले त्यानंतर तो थोडा शांत ‘झाला. कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, पुढील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी आम्ही त्याला लवकरच वैद्यकीय पाठवणार आहोत” वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (दत्तवाडी पोलीस स्टेशन)