पुणे – लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेल्या तेरा दिवसाच्या बाळाचा खून झाल्याचे समोर आले आहे. तब्बल अडीच वर्षानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. अनाथ आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने बाळाला घेऊन गेल्यानंतर तरुणीच्या प्रियकराने मित्राच्या साथीने हे कृत्य केले आहे.
अनेकदा विचारल्यानंतर देखील प्रियकर बाळाची माहिती देत नाही हे लक्षात आल्यानंतर 25 वर्षीय तरुणीने बाळ गायब केल्याची मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रियकर शुभम महेश भांडे (वय.23,रा. वडगाव शेरी) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय.26,रा.मांजरी) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, आरोपींनी बाळाचा खून करून मृतदेह विमानतळ परिसरातील वनक्षेत्राच्या झाडीत ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, बाळाला गुंडाळून ठेवलेली चादर व त्याची कपडे मिळून आले आहेत. प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीने देखील हा प्रकार पाहिल्याची माहिती दिली आहे. पंचनामा करून पोलिसांनी कपडे व चादर जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली.