पुणे – मोक्काच्या गुन्हयात मागील चार महिण्यापासून फरार असलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा आणि दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल आहे. आलोक उर्फ आल्या अर्जुन जाधव (19, रा. मंगळवारपेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 11/4/2023 रोजी पांडवनगर भागात दहशत माजवीण्याचे उद्देशाने अजय विटकर, अक्षय जाधव, सुरज जाधव, ऋषीकेश देवकुळे, अदित्य पवार, अनिकेत मंगेश वेढेकर, साहिल मांदळे, शुभम सिरकर, राहुल कांबळे, अलोक जाधव व इतरांनी हातामध्ये धारदार हत्यारे, लाकडी दांडकी घेवून रोडचे कडेला पार्क असलेल्या वाहनांची तोडफोड केली.
त्यांना फिर्यादीने असे का करता ? असा जाब विचारला असता त्यांचेवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम(मोक्का) वाढ करण्यात आली.
दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एककडील अंमलदार शशीकांत नरूटे व निलेश साबळे यांना आरोपी मंगळवार पेठेत येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , उप-आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार शशीकांत नरूटे, निलेश साबळे यांचे पथकाने केली आहे.