पुणे : दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीचा जामीन दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी फेटाळला. स्वप्नील शिरीष तवर असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणात ॲड. शाश्वती दीक्षा आणि ॲड. श्रेयस देवरे यांनी सरकारी वकिलासोबत पीडित मुलीची बाजू मांडली. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी आरोपीचा पहिला जामीन अर्जही माननीय सत्र न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये फेटाळला होता. पीडित आणि आरोपी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच भागात राहण्यास आहेत.
१७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत तवर हा क्लासला जाताना पीडितेचा पाठलाग करत होता. ‘ तु मला आवडतेस’ म्हणून टेरेसवर मिठी मारली होती. त्यानंतर तो वारंवार तिला त्रास देत होता. याबाबत जाब विचारण्यासाठी ती त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर ती घाबरली होती. घरातील लोकांनी विश्वासात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली. तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी पक्ष, पीडीता तर्फे वकील आणि बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला.