पुणे -ज्यांच्याकडे जागा नाही अशा करोना रुग्णांनी घरी न राहता विलगीकरण केंद्रात राहवे, यासाठी पालिकेने शहरात कोविड केअर सेंटर सुरू केली. तेथे 1200 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पुणेकरांनीच या सेंटरकडे पाठ फिरवली असून 24 एप्रिलअखेर अवघे 765 जणच या सेंटरमध्ये दाखल आहे.
शहरात नव्याने सापडणाऱ्या बाधितांमध्ये 70 ते 75 टक्के रुग्ण सौम्य लक्षणांचे आहेत. उर्वरित 25 ते 30 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. मात्र, हे रुग्ण घरी राहत नाहीत. तसेच नियमही पाळत नसल्याने संपूर्ण कुटूंब बाधित होत आहेत. त्यामुळे महापालिकेने गृह अलगीकरणात रुग्ण न ठेवता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे. त्यासाठी महापालिकेने तातडीनं सुविधा द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिकेने हे सेंटर सुरू केले. त्यातील 1200 पैकी 435 बेड शिल्लक आहेत.