पुणे – शहरातील करोना रुग्णसंख्या मागील आठवड्यापासून हळूहळू कमी होत आहे. त्यातच आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 52 दिवसांवर गेला आहे. मागील महिन्यात हे प्रमाण 11 दिवसांपर्यंत आले होते. तर, गेल्या आठवड्यात हा कालावधीत 37 दिवसांचा होता.
शहरात 4 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर 14 एप्रिलपासून राज्यशासनाने कठोर लॉकडाऊन लागू केले आहे. त्यानंतर पुढील आठवडयात लगेचच लॉकडाऊन आणखी कठोर करण्यात आले. शहरात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन असून त्यात केवळ दूध विक्री आणि मेडिकल सुरू आहेत. त्याचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली असून, रुग्णवाढीचा वेग कमी होत आहे. पुढील काही दिवसांत हा कालावधी आणखी वाढेल असे आशादायक चित्र असेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एकूण रुग्णसंख्या 4 लाखांवर
शहरात आतापर्यंत 4 लाख 2 हजार 655 जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी
3 लाख 48 हजार 681 रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र, 6 हजार 554 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरात 47 हजार 420 ऍक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी
1 हजार 371 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान मागील चोवीस तासांत 16 हजार 112 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. पुणेकरांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोर पालन केले, तर नव्या बाधितांचा आकडा कमी होऊन रुग्ण दुपटीचा कालावधीदेखील कमी होईल, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.