पुणे – म्हात्रेपूल ते राजाराम पूल मार्गासोबतच शहरातील मुळा-मुठा नदीच्या काठांवरील ब्लू लाइनमधील सर्वच बांधकामांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ही माहिती महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. म्हात्रेपूल ते राजाराम पुलापर्यंत नदीकाठावर निळी पूर रेषा (ब्लू लाइन) प्रतिबंधित क्षेत्रात मंगल कार्यालये, रेस्टॉरंट तसेच इतर अनधिकृत व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या आहेत. मनपा बांधकाम विभागाने त्यांना नोटीस बजावणे सुरू केले आहे.
डीपी रोडवरील अतिक्रमणे आणि तेथील व्यवसाय अतिउच्चभ्रूंसाठी असल्याचे मानले जाते. ही चालवणारी मंडळी बडी आसामी आहेत. याच ठिकाणी हॉटेल, लाॅन्सच्या नावाखाली पबसदृश्य धांगडधिंगा सुरू असतो. या विरोधात सुजन सहकारी सोसायटीने याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये येथे महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर, २०२२ मध्ये मनपा प्रशासक नियुक्तीनंतरही या भागात कारवाई केली होती.
मागील सुनावणीत महापालिकेस कारवाईचा आदेश दिल्यानंतर ती होणे अपेक्षित होते. मात्र, गणेशोत्सव तसेच इतर कारणे पुढे करत ही कारवाई पालिकेने टाळली होती. मात्र, न्यायालयाने दिलेली मुदत संपत आल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ३० व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. आता नदीच्या किनारी ब्ल्यू लाइन क्षेत्रात येणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. मात्र, न्यायालयाचा आदेश या ठिकाणच्या बांधकामासाठी असला तरी तो शहरातील ब्लू लाइनमध्ये बांधकामे असल्याने महापालिका काय निर्णय घेणार? अशी चर्चा होती.
“ब्लू लाइनमध्ये बांधकामांंना बंदी आहे. त्यामुळे इतर बांंधकामांनाही हा नियम लागू होतो. ही बाब लक्षात घेऊन शहरातील नदीकाठच्या सर्वच बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल.” – विक्रम कुमार, आयुक्त, मनपा