पुणे –महापालिकेत सोमय्या यांच्याबाबत ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्यांचा सत्कार आज (शुक्रवारी) करणार असल्याची घोषणा महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमास शहर कॉंग्रेसने विरोध केला असून, या महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त जनतेच्या हिताचे उपक्रम आणि महानगरपालिकेच्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाते. जर पालिका प्रशासनाने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर त्या ठिकाणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या सत्कारास परवानगी देऊ नये, अशी मागणी बागवे यांनी केली आहे.