पुणे –शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीला उत्तर देण्यासाठी पुणे शहर भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महापालिकेत आज सत्कार केला जाणार आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. नगरसेवक तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर यासाठीची गर्दी जमविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेकडून गुरुवारी सायंकाळीच पालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप यांनी स्वत: या व्यवस्थेचा आढावा घेतला.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सोमय्या यांना धक्काबुक्की झाल्याने शहर पदाधिकारी तसेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना पक्षातूनच रोषाला सामोरे जावे लागल्याने शिवसेनेला उत्तर देण्यासह महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला या घटनेचा फटका बसू नये, या उद्देशाने हे शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही तसेच महापालिका बंद असतानाही त्यावेळी महापालिकेत हा प्रकार घडल्याने राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकांच्या तोंडावर या घटनेने पक्षाबाबत निर्माण झालेले चित्र तसेच शहर पदाधिकाऱ्यांसह, पालिका पदाधिकाऱ्यांवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच हे शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा आहे.