पुणे -पुढील वर्षात राज्यात प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हानिहाय प्रभारी तसेच सहप्रभारींच्या नियुक्त्या केल्या आहेत.
या नियुक्त्यांमध्ये राज्य कार्यकारिणीत असलेल्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांकडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदी संजय राठोड यांची निवड करण्यात आली. सहप्रभारी पदाची जबाबदारी शाह आलम शेख, तर विजय बारसे यांच्याकडे देण्यात आली आहे.
तर प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे सोलापूर ग्रामीण, अरविंद शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर, संजय बालगुडेयांच्याकडे सांगली ग्रामीण आणि शहर, ऍड. अभय छाजेड यांच्याकडे कोल्हापूर ग्रामीण आणि शहर, श्रीरंग चव्हाण पाटील यांच्याकडे साताऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.