पुणे – ख्रिसमस सण अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त ख्रिश्चन बांधवांकडून उत्साहात तयारी सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठंतही झगमगाट दिसून येत आहे. प्रामुख्याने रंगीबेरंगी दिवे,आकर्षक सजावट, ख्रिसमसच्या सर्व वस्तू उपलब्ध असणारे स्टाॅल्स असे वातावरण सध्या रविवार पेठेत दिसून येत आहे.
बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक म्हणजे ख्रिसमस ट्री. शिवाय वेगवेगळ्या रंगांच्या बल्बमाळा आणि दागिन्यांची रेलचेल बाजारात दिसून येत आहे. काही ठिकाणी वेगवेगळे गोड पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सांताक्लाॅजचे प्रतीक असलेल्या छोट्या बाहुल्या, जिंगल बेल्स, सांताची गाडी आणि लहान मुलांसाठी लाल ड्रेसही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
विविध लोक खरेदीसाठी कुटुंबासह बाहेर पडत आहेत. चर्च असलेल्या परिसरात सजावटीची लगबग सुरू आहे. रंगीबेरंगी विजेच्या रोषणाईने शहरातील विविध चर्च उजळून निघाले आहे. तसेच चर्चच्या आतही अतीशय सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी देखील गर्दी बघायला मिळते आहे.