पुणे, दि. 2 -पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या बाजीराव रोड आणि शिवाजी रोड वरून जाणारे सात मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात मार्गावर 31 बसच्या माध्यमातून 344 फेऱ्या होणार आहेत. शुक्रवार (दि. 4) पासून हे मार्ग सुरू होणार असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पीएमपी प्रशासनाने वाहतूक कोंडीचे कारण देत 28 जुलै रोजी शिवाजी रोड आणि बाजीराव रोड मार्गे संचलनात असलेल्या मार्गामध्ये बदल करून बाजीराव रोडने जाणाऱ्या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड मार्गे व शिवाजी रोडने येणाऱ्या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळक रोड मार्गे बदल करण्यात आला होता. तर शिवाजी रोड आणि बाजीराव रोड या मार्गावरून सात मीटर लांबीच्या पुण्यदशम बस सुरू करण्यात आल्या होत्या. या बस स्वारगेट ते शिवाजी नगर पर्यंतच असल्याने उपनगर किंवा शहराच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थांना आणि नागरिकांना शहरात येण्यासाठी दोन बस बदलून यावे लागत असे. तसेच तिकीटासाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. प्रत्येक दोन मिनटांला पुण्यदशम बस प्रवाशांना उपलब्ध होईल असा दावा पीएमपी प्रशासनाने केला होता. पण, प्रत्यक्षात प्रवाशांना 15 ते 20 मिनटे बससाठी थांबावे लागत असे.
सात मार्गांवर जाताना बाजीराव रोडने व येताना शिवाजी रोडने अशा एकूण दिवसभरात 344 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे आता बाजीराव रोड व शिवाजी रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांची गैरसोय होणार नाही.
– दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक