कोथरूड, दि. 2 (प्रतिनिधी) – कोथरूड येथे “महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेवरून सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात वाद रंगला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आहेत तसेच या स्पर्धेला महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राण्याची शक्यता आहे, यातून राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चे आयोजन दि. 20 ते 25 डिसेंबरदरम्यान माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी आव्हान दिले होते.
मात्र, राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आयोध्या दौरा रद्द केला होता. त्यानंतर ठाकरे यांना आयोध्येत येण्याचे आमंत्रण नुकतेच मुंबईत भेट घेऊन महतांनी दिले होते, त्यामुळे ठाकरे यांचा आयोध्या दौरा होणार होता. त्यातच आता बृजभूषण सिंह महाराष्ट्रात तेही पुण्यात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे स्वागत कसे करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दि. 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली होती. मात्र, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी माफी मागावी. अन्यथा उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नाही, असे थेट आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिले होते. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. आता, बृजभूषण सिंह पुण्यात येत असल्याने काय वातावरण असणार याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.
“राष्ट्रवादी’चेही असणार लक्ष…
खासदार बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यावेळी बृजभूषण सिंह यांनी पवार यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे कुस्ती स्पर्धेसाठी येणाऱ्या बृजभूषण स्पर्धेच्या उद्घाटनात काय बोलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असणार आहे.