पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध महापुरूषांची जयंत्ती, पुण्यतिथी यासह विविध कार्यक्रमासाठी हार, फुले, नारळाची गरज असते. यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. दोन ठेकेदारांना दोन वर्षांसाठी लागणाऱ्या हार, फुले, नारळासाठी तब्बल 34 लाखांच्या खर्चाला प्रशासनाच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
मे. अव्दित क्रिएटर्स यांनी 24 महिने हार, फुले आणि नारळ पुरविण्यासाठी 3.50 टक्के कमी दराची निविदा सादर केली होती. त्यामुळे या ठेकेदाराला 12 लाख 46 हजार 780 रूपयांच्या खर्चाच्या निविदेला मान्यता दिली आहे.
तसेच मे. लक्ष्मी फ्लावर्स ऍण्ड डेव्हलपर्स यांनी 24 महिन्यासाठी 4.75 टक्के कमी दाराची निविदा सादर केली होती. त्यामुळे या ठेकेदाराला 22 लाख 12 हजार 657 रूपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. दोन्हीचा मिळून दोन वर्षांत तब्बल 34 लाख 59 हजार 437 रूपयांचा खर्च होणार आहे. या खर्चाला प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.