पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) या संस्थेच्या वतीने दि.16 ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर “पुणे पुस्तक महोत्सव-2023′ चे आयोजन करण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पुणे शहरातील पुस्तक महोत्सवाचे हे पहिलेच पर्व असणार आहे.
मराठे म्हणाले, “राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड आणि इतर भारतीय भाषांमधील विस्तृत पुस्तक संग्रहांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात येणार आहे.’ डॉ. शरद कुंटे यांनी या महोत्सवाच्या यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि मानसिक पोषण करण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले.
“पुण्यात वाचन संस्कृतीला पोषक वातावरण आहे. या शहरात पुस्तकांची जागतिक बाजारपेठ होण्याची क्षमता आहे. यातून पुस्तक महोत्सवाची संकल्पना पुढे आली. शहरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, साहित्य संस्था, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, लेखक, अभ्यासक या सर्वांचा सहभाग घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.” – राजेश पांडे, संयोजक, पुस्तक महोत्सव