कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळीदरम्यान जागोजागी रस्ता रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. भर रस्त्यात उभ्या विद्युत खांबामुळे केवळ 8/10 फुटांचाच अरुंद रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे.
प्रशासनाने तातडीने हे विद्युत खांब, इतर अडथळे, अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि रस्ता रुंदीकरण करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष सचिन हांडे व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. तेजस्विनी गोळे यांनी दिला आहे. हांडेवाडी व उंड्रीमध्ये सुमारे दहा-पंधरा खासगी इंग्रजी शाळा आहेत. त्यामुळे खासगी वाहने आणि स्कूल बसेसची वर्दळ मोठी आहे. शिवाय, अन्य वाहनांची दिवसभर वर्दळ असते.
मंतरवाडी ते खडीमशीन चौक मार्गावर रस्ता रुंदीकरण करताना विजेचे खांब मध्येच आहे तसा सोडून काही ठिकाणी कामे केली. हांडेवाडी चढावर रुंदीकरण न केल्याने केवळ आठ फुटच रस्ता आहे. त्यामुळे येथून एका वेळी एकच वाहन जाते. मोठे वाहन असेल तर कसरत करावी लागते.
“रात्री-अपरात्री समोरून येणाऱ्या वाहनांचे प्रखर प्रकाश दिव्यांमुळे डोळ्यांना त्रास होतो आणि वाहन डोंगर किंवा दुभाजकाला घासून अपघात होऊन नुकसान होते. रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.” – सचिन हांडे, भाजप युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष
“रस्ता रुंदीकरणासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. रास्ता रोको-आंदोलने केल्यानंतर रस्ता झाला. आता प्रशासनाने तातडीने विद्युत खांब हटवून रुंदीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.” – डॉ. तेजस्विनी गोळे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य