सिंहगडरोड – गृहनिर्माण सोसायटीतील मधमाशांचे पोळे कोणीतरी पेस्ट कंट्रोल पाडले, त्यावेळी लाखो मधमाशांचा खच खाली पडला होता. ते दृश्य पाहून मन हेलावले मी काहीच करू शकलो नाही. परंतु, ती घटना माझ्या “करिअर’ला दिशा देणारी ठरली आणि आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून मधमाशा संवर्धनाचा निर्णय घेत या क्षेत्राकडे वळलो, आज पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात माझी आमच्या “बी बास्केट’ संस्थेची ओळख असल्याचे समाधान वाटते, असे अमित गोडसे यांनी सांगितले.
आपल्या या यशस्वी व्यावसायाविषयी गोडसे म्हणाले की, सर्पमित्र आहेत त्यांच्या कामातून निसर्ग संवर्धन होते. परंतु, मधमाशांसाठी काम करणारे खूप कमी लोक आहेत. यामुळेच मधमाशा पोळे स्थलांतर या क्षेत्रात व्यावसायिक काम करता येईल या विचारातून संवर्धनाचे काम “बी बास्केट’ या फर्मद्वारे सुरू केले.
मध काढणे, मधमाशांना इजा न पोहचविता शास्वत पद्धतीने हाताळणे तसेच पोळे स्थलांतर करणे याचे प्रशिक्षण पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र तसेच महाबळेश्वर येथील खादी ग्रामोद्योगच्या केंद्रात घेतले. त्यानंतर तीन वर्षांपासून अक्षय पवार, यश काळेकर यांच्यासोबत मधमाशी स्थलांतर, संवर्धनाचे काम करीत आहे.
आपल्याकडे आग्या माशा, सातेरी माशा, फुलोरी माशा आणि इटालियन माशा असे मधमाशांचे पाच प्रकार आढळतात. आतापर्यंत 8000 पेक्षा अधिक पोळ्यांचे स्थलांतर आम्ही यशस्वीरित्या केले आहे. – अमित गोडसे, संचालक, “बी बास्केट’ फर्म, पुणे