पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोर्श कार अपघात प्रकरणात मुलाची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर वडील विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि गाडीचा चालक गंगाधाम यांना गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेली माहिती आणि अपघाताची घटना यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे. सुरेंद्र अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. यामुळे अग्रवाल कुटुंब देशभर चर्चेत आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अग्रवाल पळून गेल्यानंतर त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडे विशाल अग्रवाल याच्या ठावठिकाण्याची माहिती मागण्यात आली होती.
मात्र, त्यांनी पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नाही. दरम्यान, त्यांचा २००९ मध्ये एका गुन्ह्यात असलेला सहभाग आणि छोटा राजनशी असलेले संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, त्यांना आज (शुक्रवारी) नातवाने पबमध्ये मद्यपान केलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आले होते.
त्यांच्याकडून त्या दिवशी घडलेला एकूण घटनाक्रम जाणून घेण्यात आला. त्यांनी नातवाने पार्टीला जाण्यासाठी गाडीची चावी मागितल्यावर ती दिल्याचे सांगितले. मात्र, पुढे असे घडेल याची कल्पना नसल्याचे ही स्पष्ट केले. नातू स्वत: गाडी घेऊन पबमध्ये गेला. त्यापाठोपाठ चालक दुसरी गाडी घेऊन पबमध्ये गेला.
पबमधून बाहेर पडताना चालकाने पोर्श कार पार्किंगमधून बाहेर काढली. त्यानंतर मुलाने ती गाडी चालवण्यास मागितली. यामुळे चालकाने विशाल अग्रवाल यांना फोन करून मुलगा गाडी चालवण्याचा आग्रह करत असल्याचे सांगितले. विशाल अग्रवाल यांनी परवानगी दिल्यावर चालकाने गाडी मुलाला देऊन स्वतः बाजूच्या सीटवर बसल्याचे सांगितले.
माझा नातू अल्पवयीनच
झालेल्या घटनेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, असे सांगून आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपला नातू अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.