पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाऊस झाला की स्वारगेट स्थानकाचे प्रवेशद्वार पाण्याखाली जात असल्याने प्रवाशांना मोठी कसरत करून स्थानकात जावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून येथील पावसाळी लाइन दुरूस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर हा प्रश्न सुटणार ? की दोन पावसाळ्यानंतर पुन्हा तीच अवस्था होणार? कारण, सब वे आणि मेट्रोच्या कामामुळे पावसाळी लाइन बंद पडल्या आणि पाण्याच्या निचरा होण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे हे काम म्हणजे तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखे काम आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाबाहेरून महापालिकेची पावसाळी लाइन गेली आहे. मात्र, ही लाइन तुंबल्यामुळे एसटी परिसरातील पावसाळी लाइनही तुंबली. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यंदा पूर्व मौसमी पावसानेच प्रशासनाची पोलखोल केल्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचत आहे, त्याठिकाणी पालिकेकडून पावसाळी लाइन दुरूस्तीचे कामे सुरू आहे. यामध्ये स्वारगेट बसस्थानकातही बुधवारपासून कामाला सुरवात झाली आहे. याठिकाणी नव्याने लाइन टाकून तुंबलेली लाइन साफ करण्यात येत आहे.
दरम्यान, तहान लागल्यावर आड खोदायला घेणार अशी अवस्था पुणे महापालिका आणि एसटी प्रशासनाची झाली. एस टीने रेन व्हाॅटर हार्वेस्टींग करून घेतले तर त्याचा फायदा होईल. अशी प्रतिक्रिया प्रत्यंचा जागरूक नागरिक संस्थेचे रूपेश केसेकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या पावसाळी लाइन तुंबल्यामुळे सगळी घाण स्वारगेट एसटी स्थानकातील पावसाळी लाइनमध्ये घुसली. त्यामुळे साचणारे पाणी जाण्यासाठी जागाच राहिली नाही. महापालिकेकडून कालपासून ही पावसाळी लाइन दुरूस्त करण्याच्या कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न सुटेल असे वाटते. – भुषण सुर्यवंशी – आगार प्रमुख, स्वारगेट