पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर येथील अपघातप्रकरणी देशभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुण्यात तळ ठोकला आहे. पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक हालचाली त्यांच्याकडून टिपण्यात येत आहेत. आज (गुरुवारी) मुलाचे आजोबा आणि वाहनचालकाला पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आले होते.
तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. आजोबापाठोपाठ अग्रवाल कुटुंबाचे वकीलही पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांनाही गराडा घातला. तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली. पोलिसांनी ही परिस्थिती कशीबशी हाताळली. माध्यमांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान, अपघात करणाऱ्या मुलाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला गेला. यात मुलगा घाणेरडे शब्द वापरताना दिसत होता. मात्र, नंतर हा व्हिडिओ फेक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.