पुणे – सहकारी नागरी बॅंका, पतसंस्था तसेच अन्य सहकारी संस्था यांचे वार्षिक लेखापरिक्षण अहवाल मराठीत सादर करण्याच्या सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिल्या. या सूचनेमुळे सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती, अभिप्राय, संस्थेच्या कामकाजातील अनियमितता व गंभीर बाबींची माहिती सर्वसामान्यांना समजण्यास मदत होणार आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये सामान्य व्यक्ती या सभासद, ठेवीदार, कर्जदार या बहुतांशी व्यक्ती या मराठी भाषिक आहेत. त्यामुळे लेखापरिक्षण अहवालाचे पर्यायाने संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन होण्यासाठी लेखापरिक्षण अहवाल मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.
मात्र, राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या बाबतीत संस्थांचे वैधानिक लेखापरिक्षण अहवाल हे संस्था व निबंधकांस सादर करताना ते मराठी भाषेत सादर न करता इंग्रजी भाषेत सादर केले जातात. इंग्रजी भाषेतील लेखापरिक्षण अहवालामुळे संस्थांचे अधिकारी पदाधिकारी यांनाही या अहवालावरून संस्थेची आर्थिक स्थितीची व गुण दोषांची वस्तुस्थितीबाबत आकलन होण्यास अडचणी निर्माण होतात. पर्यायाने लेखापरिक्षण अहवालातील दोषांची पूर्तता करण्यास अडचणी उद्भवतात. यासर्व पार्श्वभूमीवर सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे.