पुणे – शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून शुल्क आकारण्यास सुरूवात केल्यानंतर मार्केट यार्डातील कामगार तसेच आडते असोसिएशनने येत्या रविवारपासून बेमुदत बंद पुकारला होता. बुधवारी मागे घेण्यात आला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून आकारण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्क रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. बाजार समितीेचे प्रशासक मधुकांत गरड, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, विशाल केकाणे आदी यावेळी उपस्थित होते.
बाजार समितीबरोबर झालेल्या चर्चेत नामपात्र प्रवेश शुल्क आकारण्यास तत्वत मान्यता देण्यात आली.
याबाबत गुरूवारी (दि. 18 नोव्हेंबर) मार्केट यार्डातील बाजार आवरात खरेदीदार आणि टेम्पोचालकांची बैठक होईल. या बैठकीत बाजार आवारात आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क नेमके किती असावे, याबाबत निर्णय होईल. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीकडे सादर करण्यात येणार असल्याचे कामगार युनियनचे संतोष नांगरे यांनी सांगितले.
खरेदीदार टेम्पोचालकांच्या सोयीनुसार बाजार समितीचे कर्मचारी त्यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून देतील. बाजार आवारात वाहन शुल्क आकारण्यात येऊ नये. टेम्पो चालकाकडून कोणी शुल्क आकारल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तीन चाकी टेम्पोचालकांकडून वाराई तसेच भराईचे शुल्क आकारण्यात येणार नाही. चारचाकी, सहा चाकी वाहनांमध्ये शेतीमाल लावण्यासाठी लेव्हीसह दोन ते पाच रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हमाल, भरणार, वारणार यांनी जेवढे काम केले आहे. तेवढेच पैसे घ्यावेत. तसेच माथाडी मंडळाची रितसर पावती द्यावी.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती