पुणे – बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञ यावर उपचार करत आहेत. खरे तर डॉक्टर हा समाजाचा मुख्य घटक आहे. शारिरीक व्याधी किंवा आरोग्यविषयक संकट आले की आपल्याला प्रथम परमेश्वर आणि नंतर डॉक्टरांची आठवण होते. त्यामुळे व्यापारीकरण बाजूला ठेऊन समाजासाठी काम करणारे डॉक्टर्स हे समाजातील परमेश्वरच आहेत, असे मत महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केले.
डायबेटिस केअर अँड रिसर्च फाऊंडेशन आणि अक्षय हॉस्पिटलतर्फे कर्वे रस्त्यावरील संस्थेच्या प्रांगणात जागतिक मधुमेह दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आयुष पुणे विभागाचे सहायक संचालक आणि ससून हॉस्पिटलच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट धर्माधिकारी, “हृदयमित्र फाऊंडेशन’चे श्रीकांत मुंदडा, अक्षय हॉस्पिटलचे डायबेटिस तज्ज्ञ डॉ. सुहास एरंडे, राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते. ज्या लहान मुलांना आणि मधुमेह आहे, त्यांना मोफत इन्सुलिन यावेळी देण्यात आले. तसेच नागरिकांची विनामूल्य तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले.
मधुमेह दिन साजरा करावा लागू नये, असा दिवस येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. ऍलोपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार अशी उपचार पद्धती वेगवेगळी असली, तरीदेखील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ती पद्धती कार्य करत असते, असे रासने म्हणाले.
मधुमेह तपासणीला शास्त्रीय नैमित्तीकपणा असणे गरजेचे आहे. हृदय, मुत्रपिंड आणि डोळे या अवयवांवर मधुमेहामुळे आघात होऊ शकतात. मधुमेहाचे प्रमाण वाढत असून, मधुमेहाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. त्यासाठी मधुमेहाचे आरोग्यदूत प्रत्येकाने व्हायला हवे, असे मत डॉ. सुहास एरंडे यांनी व्यक्त केले. डॉ. धर्माधिकारी आणि मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले. घोडके यांनी सूत्रसंचालन केले.