पुणे – पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २०१९ साली उत्तीर्ण केली होती. गेली दोन वर्षे मुलाखतीची प्रतीक्षेत असणाऱ्या स्वप्नीलने अखेर तणावातून आत्महत्या केली.
या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना २ लाखाचा धनादेश सुपूर्द केला यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, सुधीर पाटस्कर, ऍडव्हॉकेट किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव देखील यावेळी उपस्थित होते.
अमित ठाकरे म्हणाले, राज्यातील वाढत्या बेरोजगरीमुळे अनेक तरुण त्रस्त आहेत. याला सर्वस्वी जबाबदार राज्यसरकार आहे. स्वप्नीलच्या आईचा हुंदका आता तरी सरकार पर्यंत पोहचणार का ? अजून किती स्वप्नीलचे बळी राज्यसरकार घेणार आहे ? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळे स्वप्नील सारख्या एका होतकरू तरुणाने आत्महत्या केली.
राज्यसरकारने यावर अधिवेशनात चर्चा करून तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. स्वप्नीलच्या कुटुंबीयांचा पाठीमागे आपण सगळे उभे राहू, आणि राज्यसरकारला पाऊल उचलायला भाग पाडू असे देखील यावेळी ठाकरे म्हणाले.