मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना काल सरकारने एक वर्षासाठी निलंबित केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी प्रतिरूप विधानसभा भरवली होती. तेथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रतिरूप विधानसभेच्या सभापतिपदी यावेळी कालिदास कोळमकर यांची सभापती म्हणून निवड केली गेली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांवर करण्यात आलेल्या निलबंनाच्या कारवाईवरून सरकारवर चांगलीच आगपाखड करीत त्रागा व्यक्त केला. खोट्या माहितीच्या आधारे भाजप आमदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. हे वसुली आणि भ्रष्ट सरकार असून त्यांची ही कृत्ये आपण उघडी करू असे आव्हानही त्यांनी दिले.
या सभेसाठी भाजपने लाऊडस्पिकरचा वापर केला होता. विधिमंडळाच्या परिसरात अशा स्वरूपाचा लाऊडस्पिकरचा वापर करता येत नाही ही बाब सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाजपच्या सभेच्या ठिकाणचा माईक व लाऊडस्पीकर काढून नेला.
विद्यमान सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबून टाकला जात असून ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला. या प्रतिरूप विधानसभेत अन्यही भाजप सदस्यांनी सरकारच्या दडपशाहीच्या भूमिकेचा निषेध करीत आपले म्हणणे माध्यमांच्या प्रतिनिधींपुढे मांडले.