पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाइकासोबत दारू पार्टीत दोन मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील निलंबित संबंधित उपनिरीक्षकावर आता विनयभंग आणि “पॉक्सो’चा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक दीपक माने याच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. मागील आठवड्यात
(दि.17 ) रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन भावंडांना चतुःशृंगी परिसरात गुन्हे शाखेने अटक केली.
त्यानंतर माने याची आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर माने पार्टीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेले होते. मद्यपान केल्यानंतर मानेनी एका अल्पवयीन मुलीसह दोन मुलींची छेडछाड केली. याप्रकरणी चौकशीनंतर माने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. आता मुलींनी तक्रार दिल्यानंतर मानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.