पुणे @ 527 : निर्बंधांच्या हालचाली

शहरात 527 नवे करोनाबाधित सापडले;  दहा दिवसांत आढळले एक हजार ऍक्‍टिव्ह रुग्ण


दिवसभरात आणखी 7 बाधितांचा मृत्यू

पुणे – पुण्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील चोवीस तासांत तब्बल 527 करोना रुग्ण वाढल्याने येत्या एक-दोन दिवसांत प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे निर्बंध कसे असतील, हे येत्या रविवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. मात्र, नागरिकांनी करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सुरक्षेसाठी सॅनिटायझर आणि हातांची स्वच्छता या नियमांचे पालन तसेच विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरात एक फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्याभरात तर दररोज ही संख्या शंभराने वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. मागील चोवीस तासांत सर्वाधिक 527 रुग्ण आढळले तर बरे झालेल्या 280 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. ऍक्‍टीव्ह रुग्णसंख्या 2 हजार 399 वर पोहोचली आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत शहरात 1 हजार 399 ऍक्‍टीव्ह रुग्ण होते. तसेच बाधित रुग्णांबरोबरच ऍक्‍टीव्ह रुग्णसंख्याही कमी झाली होती. मात्र गेल्या आठवडाभरात ती संख्या वाढली असून, ती जवळपास दुप्पटच झाली आहे. याशिवाय सध्या 159 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 96 हजार 916 इतकी झाली असून, त्यापैकी 1 लाख 89 हजार 701 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 4 हजार 254 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.