पुणे | राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारजे माळवाडी परिसरातून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 52 लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.6) करण्यात आली असून यासंदर्भात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णा तुळशीराम कांदे (वय-30, रा. मु. अंबील वडगाव, ता. बीड)हे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवा राज्यासाठी विक्रीचा परवाना असलेल्या मद्याची वारजे माळवाडी परिसरातून वाहतूक होणार असल्याची माहिती या विभागाला मिळाली होती.
त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने एकूण 450 बॉक्स, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, बीडचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.