पुणे – “म्युकर मायकोसिस’चे जुलैमध्ये 21 तारखेपर्यंत 16 रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागातील बाधितांपेक्षा शहरातील बाधितांची संख्या जास्तच आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या अजूनही म्हणावी तेवढी कमी नाही. गेल्या एप्रिलपासून 504 रुग्णांची नोंद महापालिका हद्दीत झाली आहे. त्यातील 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
“म्युकर मायकोसिस’ झालेल्या रुग्णांची नोंद एप्रिलपासून महापालिकेने ठेवण्याला सुरूवात केली. एप्रिलमध्ये 168 बाधितांची नोंद झाली होती, त्यातील एकाचा मृत्यू झाला.
मेमध्ये 161 नव्या बाधितांची नोंद झाली तर 18 जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये आणखी 159 बाधितांची नोंद झाली असली, तरी मृतांची संख्या मात्र जास्त होती. जूनमध्ये सर्वाधिक म्हणजे 32 जणांचा या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
जुलैमध्ये बाधितांची संख्या मागील तीन महिन्यांच्या मानाने कमी असली, तरी ती 16 इतकी आहे. तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान 504 बाधितांपैकी 458 जणांवर उपचार झाले, त्यातील 328 जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे. उपचारानंतर 328 जण बरे झाले असून, सद्यस्थितीत 116 जणांवर उपचार सुरू आहेत.