पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस होऊनही करोना बाधित झालेल्या सुमारे साडेचारशे नागरिकांची नोंद महापालिकेने केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती घेण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यापुढेही हा शोध सुरू राहणार आहे.
करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेकजण बाधित झाल्याची अनेक उदाहरण पुढे येत आहेत. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी अशा व्यक्तींचा शोध घेण्याचा आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने मागच्या महिन्यापासून अशा व्यक्तींचा शोध घेण्याला सुरूवात केली आहे. त्यातून आतापर्यंत ही माहिती समोर आली आहे.
त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या टीमलाही यासंदर्भात माहिती गोळा करण्याला सांगितले आहे. याशिवाय सरकारी शिवाय खासगी पॅथॉलॉजी लॅबनाही ही माहिती गोळा करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणे दिसल्यास ज्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये स्वॅबचे सॅम्पल देण्यासाठी व्यक्ती जाते, तेथे जो माहितीचा फॉर्म भरून घेतला जातो त्यामध्ये लसींचे किती डोस झाले आहेत, याविषयी माहिती भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच दोन्ही डोस झाल्यानंतरही जर कोणत्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, तर त्याची माहिती त्वरित महापालिकेला कळवावी, असे सक्त आदेशही पॅथॉलॉजी लॅबना देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या माहिनाभरात दुसरी लस घेऊनही बाधित झालेल्या सुमारे साडेचारशे व्यक्तींचा शोध महापालिकेने घेतला आहे.