पुणे – जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात वाढलेली सक्रीय बाधित संख्या काहीशी कमी होताना दिसत आहे. दि. 7 जुलै रोजी जिल्ह्यातील सक्रीय बाधित संख्या 10 हजार 122 वर पोहचली होती. मात्र, मागील दोन आठवड्यांत या संख्येत सहाशे ते सातशेने घट झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात सक्रीय बाधित संख्या 9 हजार 308 इतकी आहे.
फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यावेळी जिल्ह्यात एकूण बाधित 3 लाख 72 हजार 237 इतके होती. मागील पाच महिन्यांत दुप्पटीने म्हणजे 7 लाख 5 हजार बाधित वाढले आहेत. जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे सक्रीय बाधितांमध्ये हळूहळू घट होऊ लागली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सक्रीय बाधित संख्या 3 हजार 908 इतकी होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ही सक्रीय बाधित संख्या तब्बल 97 हजार 23 वर गेली.
दि.23 जून रोजी सक्रीय बाधित संख्या 8 हजार 493 पर्यंत खाली आली होती. पण, 7 जुलै रोजी पुन्हा सक्रीय बाधित संख्या 10 हजाराच्या पुढे गेली. त्यानंतर ही संख्या वाढण्याची भीती होती, परंतू, मागील दोन आठवड्यांत सक्रीय बाधित संख्येत घट होताना दिसत आहे.