मुंबई : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वितुष्ठ हे सर्वपरिचित आहे. दरम्यान.नारायण राणेंनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांचा एकेरी उल्लेख केला. या सर्व प्रकारावर आता शिवसेनेकडून नारायण राणेंना जाहीर इशाराच देण्यात आला आहे.
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणेंना जाहीर इशारा दिला आहे. “यांना समजत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे, ती अजून वाढू देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं.काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही जर मोठे झाले असाल, तर कुणामुळे झाले हे लक्षात ठेवा. यानंतर जास्त काही बोलू नका. तुम्ही वाईट बोललात तर आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही मग काहीही बोलू”, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
“नारायण राणेंना मी सांगेन की त्यांनी बेकायदा घर बांधकाम केलं. एखादा सरपंच, नगरसेवकानं बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. मग आता या खासदारानं जर बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली पाहिजे. त्या कारवाईच्या भीतीने दुसरंच काहीतरी करायचं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची असं चालू आहे”, असे देखील खैरे यांनी म्हटले.
नारायण राणेंनी या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. “उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहांना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते. तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते”, असे राणे म्हणाले.
“उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत”, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.