Nawaz Sharif Son-in-law Captain Safdar : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या इस्रायल -हमास युद्ध सुरु आहे. या युद्धाचे पडसाद सर्वच देशांवर पडताना दिसून येत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे नेते कॅप्टन सफदर यांनी एका रॅलीला संबोधित करताना भारत आणि इस्रायलच्या विरोधात उघडपणे गरळ ओकली आहे. एवढेच नाही तर ‘मुस्लिमांना गझवा-ए-हिंद’साठी तयार राहण्याचे प्रक्षोभक विधान केले आहे.
पेशावरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पॅलेस्टाईन समर्थक रॅलीत कॅप्टन सफदर यांनी हे प्रक्षोभक विधान केले आहे. आपल्या संबोधनादरम्यान सफदर यांनी, ‘जर मुस्लिम जिहादसाठी तयार नसतील तर त्यांना अपमानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे ‘मुस्लिमांनो, जिहादसाठी तयार व्हा. गझवा-ए-हिंदसाठी सज्ज व्हा. असे प्रक्षोभक विधान त्यांनी केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे अणुबॉम्ब सर्व मुस्लिमांचे आहेत, असेही सफदर यांनी म्हणत काश्मीर आणि पॅलेस्टाईनचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, गाझामध्ये लहान मुले आणि महिलांचे मृतदेह टाकले जात आहेत. त्यांनी नवाझ शरीफ यांच्या विधानाचा हवाला दिला, ज्यात त्यांनी काश्मीरबाबत आण्विक धमकी दिली होती. सफदरने जमावाला पुढे जिहादसाठी सज्ज होण्यास सांगितले. आज पॅलेस्टाईनचे लोक तुमच्याकडे बघत आहेत, गाझातील मुस्लिमांना सांगा की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत., असे म्हणत गाझातील नागरिकांना त्यांनी समर्थन दिले आहे.
कॅप्टन सफदर यांनी ज्या रॅलीला संबोधित केले ती रॅली पाकिस्तानी कट्टरतावादी पक्ष जमियत-ए-उलामा इस्लामने गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आली होती. उल्लेखनीय आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे प्रदीर्घ कालावधीनंतर लंडनहून पाकिस्तानात परतत आहेत, याआधी त्यांचा पक्ष पीएमएल-एनने त्यांच्या स्वागतासाठी रॅली काढल्या आहेत.