वीज ग्राहकांना सक्षम सेवा द्या, अन्यथा आंदोलन

आंबेगाव तालुका ग्राहक समन्वय समितीचे महावितरणला निवेदन

मंचर-मंचर परिसरातील वीज ग्राहकांना वीज बिले वेळेवर मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहे. वीजमंडळाने ग्राहकांना सक्षम सेवा द्यावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल. असा इशारा आंबेगाव तालुका ग्राहक समन्वय समितीचे अध्यक्ष बंटी क्षीरसागर यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने वीजबिल वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. अनेक वेळा ठेकेदार उशिरा बिले देतो. तर काही वेळा वीजबिल वाटण्यास उशीर झाल्याने ग्राहकांकडे वीज बिल उशिरा पोहोचते. वाडीवस्तीवर वीज बिल वेळेत पोहोचत नाहीत. बहुतांश ठिकाणी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने आहेत त्यांनाच चालवून घ्यावे लागते. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे वडगाव काशिंबेग या गावात 33/11 चे सबस्टेशन असूनही त्यावरुन गावासाठी स्वतंत्र फिडर देण्यात आलेला नाही.

जेणेकरुन गावात वीज 24 तास राहील. वडगाव काशिंबेग गावाला वायरमन नाही. त्यासाठी पूर्ण वेळ वायरमनची नेमणूक करण्यात यावी. वारंवार वीज देयकाच्या अंतिम दिनांकानंतर वीजबिल घरी येते. त्यामुळे विनाकारण अतिरिक्त दंड भरावा लागतो. मागील सहा महिन्यांपासून वीज वितरण कंपनीच्या लेखी पत्रव्यवहार करुन या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. यावर वेळीच उपाययोजना होऊन अतिरिक्त दंडाची रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसुरक्षा दलाचे सचिव बंटी क्षीरसागर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.