पिंपरीत सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची घोषणा; पाणीकपातीचे खापर लोकसंख्या वाढीवर

पिंपरी: येत्या सोमवारपासून (दि.25) एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मंगळवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी टंचाई नाही, मात्र समन्यायी पाणी पुरवठा करण्यासाठी दोन महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असेही आयुक्त म्हणाले. शहराला पाणीपुरवठा करणारे धरण यंदा दोनवेळा शंभर टक्के भरले. यावर्षी नोव्हेंबर महिना मध्यावर आलेला असतानाही धरण तुडुंब भरलेले आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पाणी साठा धरणामध्ये असतानाही शहरवासियांवर कृत्रिम पाणीटंचाई लादण्यात आली आहे.

मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिंपरी चिंचवडमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, यावरून वारंवार प्रशासनाला नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात पाणी पुरवठ्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले तसेच सर्व प्रभाग समिती अध्यक्ष, पाणी पुरवठा विभागाचे मकरंद निकम, रामदास तांबे, प्रवीण लडकत यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. आयुक्त म्हणाले, पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. समन्यायी पाण्याचे वाटप करण्यात यावे यासाठी आज बैठक घेऊन उपाय योजना आखण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.