आळंदीत पोलिसांचा फौजफाटा तैनात

शहरात तिसऱ्या डोळ्याची नजर : मुख्य चौकांमध्ये पोलीस मदत केंद्र उभारणी सुरू

आळंदी- संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, आळंदी पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाणे, दिघी-आळंदी वाहतूक विभाग सज्ज झाले आहे. बुधवार (दि. 20) पासून कार्तिकी वारीसाठी शेकडो पोलिसांसह, विविध सुरक्षा पथके नेमण्यात आली आहेत. शहरात मुख्य चौकांमध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात येत असून शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

सोहळ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत, पोलीस मित्र, स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत. चाकण, वडगाव रस्त्यावरील भैरवनाथ मंदिर, आळंदी नगरपरिषद, लक्ष्मीमाता मंदिर, महाद्वार, देहूफाटा (वाय जंक्‍शन), चावडी आदीं चौकांच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रं उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहे.

इंद्रायणी नदी परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरा, चाकण चौकात भुरट्या चोऱ्या आणि पाकिटमारीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. वारी काळात दोन सत्रांत पोलिसांचा बंदोबस्त राहिल. मंदिर आणि मंदिर परिसरात 200 पोलिसांचा बंदोबस्त, तर महाद्वार, पंखा मंडपात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी इंद्रायणी घाट आणि मंदिर परिसरात महिला पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून आळंदीमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिंडीचे ट्रक, टेम्पो यांना यातून वगळण्यात आले असून त्यांना सोहळ्यासाठीचे विशेष पास देण्यात येत आहेत. हे पास गाडीवर लावणे बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे पोलिसांनाही वाहनांचे नियंत्रण करणे सोपे जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

  • पोलिसांकडील मनुष्यबळ
    आळंदी पोलीस ठाण्याला तीन, दिघी पोलीस ठाण्याला एक, वाहतूक विभागाला तीन असे 7 सहायक पोलीस आयुक्‍त. 32 पोलीस निरीक्षक त्यात आळंदी विभाग 22, दिघी विभाग 6, वाहतूक विभाग 4 हजार 140. सहायक निरीक्षक त्यात आळंदी विभाग 70, दिघी विभाग 40, वाहतूक विभाग 30. 1030 पुरुष पोलीस कर्मचारी त्यात आळंदी विभाग 720, दिघी विभाग 310. 270 महिला पोलीस कर्मचारी त्यात आळंदी विभाग 190, दिघी विभाग 80. 200 वाहतूक पोलीस कर्मचारी. 450 पुरुष पोलीस होमगार्ड त्यात आळंदी विभाग 300, दिघी विभाग 150. महिला होमगार्ड 200 त्यात आळंदीसाठी 150 व दिघीसाठी 50 असा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचसोबतच दोन एसआरपीएफ प्लाटून, दोन एनडीआरएफ तुकडी,दोन बीडीएसपथक असा पोलीस बंदोबस्त कार्तिकी वारी काळात राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.