ब्रुसेल्स – आजकाल युरोपीय देशांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. गुरुवारी युरोपियन युनियनची बैठक झाली, ज्यामध्ये युक्रेनला आणखी आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. तर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील अनेक रस्ते अडवले. आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरून शहरभर मोर्चा काढला आणि यादरम्यान रस्त्यावर अंडी फेकण्यात आली आणि अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये गुरुवारी सुमारे एक हजार ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले. शेतकरी युरोपियन युनियनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांच्या समस्या विचारात घेऊन त्यांच्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली जाईल. उल्लेखनीय आहे की, निदर्शनानंतर बेल्जियमच्या पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली असून, या विषयावर चर्चा करण्यास सांगितले आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अलीकडेच इटली, स्पेन, रोमानिया, पोलंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि नेदरलँडमध्येही शेतकऱ्यांनी निदर्शने केली आहेत. शेतकऱ्यांचा विरोध पाहता फ्रान्स सरकारनेही त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. युक्रेनमधून स्वस्त कृषी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावरही युरोपियन युनियनमध्ये विचार केला जात आहे.
ही आहेत आंदोलनाची कारणे…
१. शेतमालाला मिळत नाही योग्य दर
२. विविध करांचे लादले आहे ओझे
३. पर्यावरणाच्या निर्बंधांचा त्रास असह्य
४. निर्यातीमध्ये मोठी स्पर्धा
५. रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
६. शेतमाल आयातीवर विविध सवलती
७. देशांतर्गत बाजारपेठेत मालाचा उठाव नाही
८. आर्थिक असुरक्षिततेची भीती