लखनौ – हिंदुस्तानात ज्यावेळी जुलमी मुघल शासक औरंगजेब राज्य करत होता, त्या काळामध्ये महाराष्ट्रातून औरंगजेबाला जेरीस आणत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आजे.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ या नाटकाच्या सादरीकरणापूर्वी योगी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्यांच्या शत्रूंबद्दलचे आचरण हे भगवद्गीतेतील वचनांना अनुसरुन होते. चांगल्याचे संरक्षण आणि दुष्टांचा नाश करणे यासाठी भगवद्गीतेत भगवान कृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘परित्रानय साधुनं विनाशया च दुष्कृतम्’ या संस्कृत श्लोकावर आधारित असा शिवाजी महाराजांचा राज्यकारभार होता.
योगी पुढे म्हणाले की, भारतीय समाज जेव्हा जेव्हा ही रणनीती अवलंबतो तेव्हा त्याचा कधीही पराभव होणार नाही आणि तो आपल्या सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे यशस्वीपणे संरक्षण करेल. भगवद्गीतेतील प्रभू राम आणि भगवान कृष्णाच्या शिकवणींचे श्रेय दिलेले दोन शब्द महत्त्वाचे आहेत. आम्ही चांगल्या लोकांचे रक्षण करू, परंतु वाईटाचा नाश करण्यास मागेपुढे पाहणार नाही. हेच धोरण शिवाजी महाराज यांनी अवलंबले होते.
ज्यावेळी औरंगजेब भारताची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळख नष्ट करण्यास आसुसलेला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू साम्राज्याची घोषणा करत होते. हे अभूतपूर्व होते, असेही योगी म्हणाले.