पुणे – करोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे मद्यविक्री केंद्रावर होणारी गर्दी पाहता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि त्या क्षेत्रालगतच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क मिळावे, महसुलात वाढ व्हावी म्हणून टाळेबंदी नियमांमध्ये अंशत: शिथिलता देत प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त इतर परिसरात मद्यविक्री दुकाने सुरू करण्यास मुदत देण्यात आली. मद्यविक्री सुरू होताच अनेक दुकानांच्या बाहेर एक ते दीड किमी अशा रांगा लागण्यास सुरुवात झाली. कडक उन्हात तासन्तास गर्दी होत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. जनसामान्यातूनदेखील प्रशासनाच्या धोरणावर टीका होताच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी मागील नियम रद्द करून नवीन पत्रक काढले.
जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार बुधवारपासून प्रतिबंधित क्षेत्राच्या आजूबाजूच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री केंद्र बंद राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखणे बंधनकारक राहील. मद्यविक्री ठिकाणी किंवा मद्यालयात मद्य सेवन करता येणार नाही. मद्य वाहतूक परवाना आवश्यक असेल. खरेदी विक्रीचा भंग होणार नाही याचे पालन करावे. किरकोळ मद्यविक्री दुकानाच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.