Bangladesh Team For T20 World Cup 2024 : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसी T20 विश्वचषक 2024 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशच्या टी20 संघात कोणतेही महत्त्वाचे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतलेले जवळजवळ सर्व खेळाडू ICC T20 विश्वचषक 2024 संघाचा भाग आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्धची पाच सामन्यांची टी-20आंतरराष्ट्रीय मालिका 4-1 ने जिंकली.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने T20 विश्वचषकासाठी नझमुल हुसेन शांतोवर कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आहे. बांगलादेशच्या T20 विश्वचषकासाठी या संघात दुखापतग्रस्त तस्किन अहमदचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुखापतग्रस्त खेळाडू तस्किनकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 12 मे रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यापूर्वी तस्किन अहमदला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सामना खेळू शकला नाही. त्याने चार सामन्यांत आठ विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले होते. डॅशिंग वेगवान गोलंदाज तस्किनला साईड स्ट्रेनचा सामना करावा लागला, आता तो पुढील काही आठवडे उपचार घेणार आहे. यानंतर तो मैदानात परतणार आहे.
बांगलादेशच्या संघात अनुभवासोबतच नव्या खेळाडूंचाही समावेश आहे. तर शाकिब अल हसनलाही संघात स्थान मिळाले आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब 2007 मधील टी-20 उद्घाटन आवृत्तीपासून प्रत्येक टी-20 विश्वचषक खेळला आहे. शाकिब अल हसन अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 सामन्यांसाठी दीर्घ कालावधीनंतर संघात परतला आहे. यंदा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये खराब फॉर्म असूनही लिटन दासलाही संघात स्थान मिळाले आहे. अफिफ हुसैन आणि हसन महमूद यांना प्रवासी राखीव म्हणून संघात स्थान मिळाले आहे.
बांगलादेश क्रिकेट संघ आपला पहिला सामना 8 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. बांगलादेश क्रिकेट संघ ड गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि नेपाळसह आहे. बांगलादेशचा दुसरा गट सामना 10 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे, त्यानंतर 13 जूनला बांगलादेशचा सामना नेदरलँडशी होईल, तर 16 जूनला नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात सामना होईल. बांगलादेशचे पहिले दोन गट सामने अमेरिकेत, तर उर्वरित दोन गट सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करत आहे.
Bangladesh Squad | ICC Men’s T20 World Cup West Indies & USA 2024 🫶 🇧🇩 #BCB #Cricket #T20WorldCup 2024 pic.twitter.com/GKJ89MzeLL
— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 14, 2024
आयसीसी T20 विश्वचषक 2024 साठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद (उपकर्णधार), लिटन कुमार दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शकीब अल हसन, तौहीद हृदय, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, साकिब मेहंदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनजीद हसन साकिब.