आयुक्‍तालयात दोन स्वतंत्र पथकांची निर्मिती

महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र पथकाद्वारे तपास

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये महिला अत्याचाराच्या घटनामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व दोषींना लवकरात लवकर पकडण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर.के पद्मनाभन यांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, अनैतिक व्यापार आणि घरगुती हिंसाचार आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने या गुन्ह्यांची लवकर उकल व्हावी तसेच अशा घटना रोखण्यासाठी या गुन्ह्यांबाबत तपास पथके स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस महासंचालकानाच पथकाचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करण्याबाबत राज्यातील दाखल गुन्हे आणि त्यांच्या तपासाबाबत एक अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता.

महासंचालकांकडून पाठविण्यात आलेल्या अहवालानंतर केंद्राकडून राज्यात सात ठिकाणी अशा पथकांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यात सात ठिकाणी पोलिसांना असे पथक स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये स्वंतत्रपणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा समावेश नसला तरी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय हद्दीतील गुन्ह्यांची संख्या व तीव्रता लक्षात घेवून स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

असे असेल पथक विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांच्या तपासांवर लक्ष ठेवून आरोपींच्या विरोधात तत्काळ खटले दाखल व्हावेत, असा या पथकांच्या स्थापनेमागील उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडसाठी महिला अत्याचार तपास पथकाची रचना करण्यात आली. यामध्ये दोन्ही पथकांसाठी दोन सहायक निरीक्षक, दोन फौजदार (दोन्हींपैकी एक महिला अधिकारी) आणि दोन्ही पथकांसाठी प्रत्येकी एक हवालदार, एक पोलीस नाईक व चार शिपाई अशी रचना असणार आहे. लवकर या पथकाच्या मार्फत कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.