साताऱ्याची अखेरची फेरी 4 वाजेपर्यंत जाहीर होणार

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची माहिती
व्हीव्हीपॅट मोजणीमुळे अंतिम निकाल उशिरा

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार असून अंतिम फेरीची घोषणा साधारण दुपारी 4 वाजेपर्यंत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. पोस्टल, ईटीबीपीएस आणि ईव्हीएम मतांची मोजणी दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅट मते मोजायची आहेत. या प्रक्रियेला अधिक वेळ लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अंतिम निकाल रात्री उशिरा जाहीर होईल, असे देखील सिंघल यांनी सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर सिंघल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सिंघल म्हणाल्या, गुरूवार दि.23 रोजी सकाळी 8 वाजता 20 टेबलवर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणी प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी पोस्टलसाठी 6 आणि डीटीबीपीएस मतांसाठी 20 टेबलवर मोजणी करण्यास सुरूवात होणार आहे.

सैनिकांची 8 हजार मते प्राप्त

सैनिकांचे मतदान अधिक व्हावे यासाठी यंदा पोस्टल ऐवजी ईटीबीपीएस तंत्रज्ञानाद्वारे 9 हजार 502 मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी अत्तापर्यंत 8 हजार 188 मते प्राप्त झाली आहेत. त्या मतांची स्क्रिीनिंगव्दारे मतमोजणी करण्यात येणार आहे. तर मतदारसंघातून शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची अत्तापर्यंत 2 हजार 254 मते प्राप्त झाली असून ही मते 23 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत, असे सिंघल यांनी सांगितले.

डीटीबीपीएस ही मते सैनिकांची असून ती स्क्रिीनिंग करून तपासावी लागणार आहेत. ह्या प्रक्रियेला अधिक वेळ लागण्याची शक्‍यता गृहीत धरून व आयोगाच्या मान्यतेनुसार पहिल्या फेरीच्या ईव्हीएम मशिनची मोजणी सुरुवात होणार आहे. दरम्यान, मतदारसंघात एकूण 446 मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र सातारा-जावली आणि वाई विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील मतांची मोजणीसाठी सर्वाधिक 23 फेऱ्या होणार आहेत. त्यापाठोपाठ पाटणसाठी 20, कोरेगावसाठी 18, कराड-उत्तरसाठी 17, कराड-दक्षिणसाठी 16 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला एकाच वेळी सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे.

वखार महामंडळ, औद्योगिक वसाहत, सातारा येथे मतमोजणी होणार असून त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशिन स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्याच पध्दतीने वखार महामंडळात मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघ व पोस्टल आणि डीटीबीपीएस स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचारी यांना स्वतंत्र रंगाचे आयकार्ड वितरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम मशिन बाहेर घेवून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र रंगाचे टी शर्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधींना नेमूण दिलेल्या ठिकाणीच थांबावे लागणार आहे, असे सिंघल यांनी सांगितले.

निकालानंतरची परिस्थिती हाताळण्यास सज्ज

निवडणुकीच्या निकालानंतर अनुचित प्रकार घडले तर कशाप्रकारे सामोरे जाणार, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर सिंघल म्हणाल्या, अत्तापर्यंत निवडणूक शांततेत झाली आहे. प्रत्येक उमेदवार खेळाडूवृत्तीने निवडणूकीला सामोरे गेले. त्यामुळे निकालानंतर अनपेक्षित काही घडेल, असे वाटत नाही. मात्र, मतमोजणी आणि निकालानंतरच्या नियोजनाबाबत पोलीस अधिक्षकांसोबत बैठक होणार आहे. त्यामुळे निकालानंतर काही ही परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही सज्ज आहोत, असे सिंघल यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.