पुण्यातील सीएसआयआर-एनसीएलकडून नावीन्यपूर्ण संशोधन
पुणे – करोना प्रादुर्भावाशी लढण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन होत आहेत. याच साखळीत पुण्यातील सीएसआयआर-एनसीएलकडूनही नवीन प्रयोग केले जात असून, नुकतेच संस्थेतर्फे करोना रुग्ण तपासणीसाठी आवश्यक डिजिटल आय आर थर्मामीटर आणि ऑक्सिजन एनहान्स उपकरणाची निर्मिती केली आहे.
सीएसआयआर-एनसीएलच्या नवोन्मेष केंद्राच्या (व्हेंचर सेंटरच्या) माध्यमातून डिजिटल (आयआर) इन्फ्रारेड थर्मामीटर विकसित केला आहे. सेंटरचे प्रतीक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील बिमेक कंपनीच्या सहयोगाने हा थर्मामीटर विकसित करण्यात आला आहे. जो करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठीच्या उपायांचा महत्त्वाचा घटक आहे. मोबाइल फोन किंवा पॉवर बॅंकांचा उर्जा स्रोत म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. देशभरातील उत्पादकांना तयार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह आयआर थर्मामीटरचे उत्पादन करण्यासाठी डिझाइन विनामूल्य उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त संस्थेतर्फे ऑक्सिजन पातळी वाढविणारे उपकरण (ओईयू) तयार करण्यात आले आहे.
कोव्हीड -19 रुग्णांच्या तातडीच्या गरजांपैकी एक म्हणजे त्यांच्या फुप्फुसांची क्षमता कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करणे. वातावरणातील ऑक्सिजन पातळी 21-22% ते-38-40% पर्यंत वाढविण्यासाठी हे उपकरण (जएण)विकसित करण्यात आले आहे. एनसीएलच्या पॉलिमर विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास खरुल यांनी हे उपकरण विकसित केले आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील उपकरणे पुण्यात तयार आहेत आणि चाचणीसाठी टीयूव्ही राइनलॅंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बंगळुरू येथे पाठविली जातील. एनसीएल बीईएलतर्फे पुण्यात सुमारे 10 ओईयू उपकरणे बसविली जातील आणि चाचण्यानंतर त्यांचे प्रमाण वाढवण्यात येईल, अशी माहिती संस्थेतर्फे संपर्क प्रमुख पी. के. इंगळे यांनी दिली आहे.
प्रायोगिक उत्पादनांनंतर वाढणार व्यावसायिक उत्पादन
टीयूव्ही राइनलॅंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बंगळुरू येथे प्रायोगिक स्तरावर वितरण आणि चाचणीसाठी सुमारे 100 प्रायोगिक उपकरणे तयार केली जात आहेत. तसेच पाच, इन्फ्रारेड नॉन कॉन्टॅक्ट थर्मामीटर पुणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.